नवी दिल्ली - गुगल 'पे'ने सुरू केलेले 'नियरबाय स्पॉट' हे नवे फीचर देशभरातील 35 शहरांसाठी सुरू केले आहे. मागील महिन्यात गुगलने हे फीचर लाँच केले होते. याच्या माध्यमातून आपल्या परिसरातील कोणती दुकाने आवश्यक वस्तू पुरवत आहेत, याची माहिती मिळत आहे.
व्यापारी आस्थापने आता यावरून त्यांचे व्यवसायाची वेळ यावर दर्शवू शकतात. तसेच, स्टोअरवर सामाजिक अंतर राखले जात आहे किंवा नाही, आवश्यक वस्तू सध्या उपलब्ध आहेत का, याविषयीची माहिती यातून मिळणे शक्य आहे.
या फीचरच्या माध्यमातून वापरकर्ते घरगुती गॅस सिलेंडर बुक करू शकतात. यावरून एचपी, भारत पेट्रोलियम किंवा इण्डेन या कंपन्यांचे गॅस सिलेंडर बुक करता येतात. तसेच, याचे पैसेही अॅपच्या माध्यमातून भरता येतात. हे तिन्ही पुरवठादार आता गुगलच्या माध्यमातून लोकांपर्यंत 'लाईव्ह' येऊन पोहोचले आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीने 'कोरोनाव्हायरस स्पॉट'ही सुरू केले आहे. हे वापरकर्त्यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सुरक्षेविषयी अधिकृत मार्गदर्शक सूचना पुरवते. तसेच, मदतकार्यासाठी देणग्या स्वीकारणाऱ्या विविध धर्मादाय संस्थांना जोडते.