पणजी - राजकारण्यांनी भंडारी समाजावर नेहमीच अन्याय केला आहे. राजकारणासाठी भंडारी समाजाला वापरून घेतले जाते आणि त्यानंतर फेकून दिले जाते. यापुढे असे कृत्य झाले तर समाजाने विचार करावा, असे गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक म्हणाले. आज सकाळी मगोपने लवू मामलेदार यांची पक्षातून हकालपट्टी केला. याच घटनेचा निषेध करण्यासाठी समाजाने सभा बोलवली होती. यावेळी नाईक बोलत होते.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोमंतकातील बहूजन समाजाचा विकास व्हावा यासाठी मगोपची स्थापना केली होती. त्यानंतर १७ वर्ष या पक्षाची राज्यात सत्ता होती. अशा पक्षासाठी पोलीस उपाधीक्षक असलेल्या लवू मामलेदार यांनी नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेत मगोपमध्ये सामील झाले. त्यांनंतर ते आमदार म्हणूनही निवडून आले, तर दुसऱ्या वेळी निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करत असताना अचानक त्यांना धक्काबुक्की करून का हकालपट्टी करण्यात आली, याचे स्पष्टीकरण मगोपच्या अध्यक्षांनी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मामलेदार यांच्या बाबत आज घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. मगो पक्षाध्यक्ष ढवळीकर यांनी बहूजन समाजाला गृहीत धरू नये. हा समाज योग्य वेळी धडा शिकवेल. मामलेदार मगोला आज का नको झाले? ते जाहीर करावे. तसेच येणाऱ्या पोटनिवडणुकीत बहुजन समाजाने विचार करावा. विशेषतः महाराष्ट्रवादी गोमंतक उमेवारांविषयी जागृत राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
दरम्यान, काँग्रेसच्या आमदाराने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या शियोडा मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर स्वतः उमेदवार म्हणून प्रचार करत आहेत. या मतदारसंघात भंडारी समाजाचे ४५ ते ५० टक्क्यांच्या आसपास मतदार आहेत.