नवी दिल्ली - कारगील युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या वायू सेनेच्या 'गोल्डन एरो स्क्वॉड्रन १७' पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. फ्रॉन्सकडून मिळणाऱ्या राफेल लढाऊ विमानांचा स्क्वॉड्रन १७ मध्ये समावेश करण्यात येणार आहे. ही स्क्वॉड्रन २०१६ मध्ये बंद करण्यात आली होती. आता ती पुन्हा आत्याधुनिक राफेल विमानांने झेप घेण्यास सज्ज होणारा आहे.
वायू सेना प्रमुख बी. एस धनोवा यांनी कारगिल युद्धामध्ये या १७ स्क्वॉड्रनचे नेतृत्त्व केले होते. हरियाणातील अंबाला एअर फोर्स तळावर एका कार्यक्रमात धनोवा १७ स्क्वॉड्रन सुरू करणार आहेत. या महिन्याच्या शेवटी फ्रॉन्सबरोबर झालेल्या कराराअंतर्गत पहिले राफेल लढाऊ विमान भारताला मिळणार आहे. त्याचा समावेश या १७ स्क्वॉड्रनमध्ये करण्यात येणार आहे.
हेही वाचा - इराणसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कतारमध्ये अमेरिकन F-22 फायटर विमाने तैनात
वायू सेनेची १७ स्क्वाड्रन १९५१ साली स्थापन करण्यात आली होती. या तुकडीत त्यावेळी 'डेहविल्लैंड वैम्पायर' विमानांचा समावेश होता. त्यानंतर स्क्वॉड्रन १७ मध्ये भारतीय बनावटीची मिग विमाने दाखल झाली होती. मात्र, हळुहळू त्यातील विमानांची संख्या कमी करण्यात आली. २०१६ साली स्क्वॉड्रन १७ बंद करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा ती राफेल लढाऊ विमानांनी सज्ज होणार आहे.
पाकिस्तान सीमेपासून फक्त २२० किमी अंतरावर असल्यामुळे अंबाला एअर फोर्स स्टेशनला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कोणत्याही आगळीकीला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज होणार आहे. याशिवाय पश्चिम बंगाल मधील हसीमारा वायू सेनेच्या तळावर राफेल लढाऊ विमान तैनात केले जाणार आहे.
हेही वाचा - राफेलविना आम्ही पाकच्या एफ-१६चा सामना कसा करणार, केंद्राचा न्यायालयात युक्तिवाद
फ्रॉन्स सरकारबरोबर केलेल्या राफेल कराराअंतर्गत भारताला ३६ राफेल विमान मिळणार आहेत. त्यातील पहिले ४ विमाने या महिन्याच्या शेवटपर्यंत मिळणार आहे. मात्र, राफेल भारतात आल्यानंतर त्याची कडक चाचणी घेण्यात येणार आहे. नंतरच भारतीय वायू सेनेमध्ये त्याचा समावेश करण्यात येणार आहे. राफेल विमान आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.