पणजी - गोव्यात आज (सोमवार) पहिल्या कोरोना बळीची नोंद झाली आहे. मडगावच्या एएसआय रुग्णालयामध्ये एका ८५ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही व्यक्ती सत्तारी तालुक्यात असणाऱ्या मोर्लेम गावातील रहिवासी होती, अशी माहिती मिळाली आहे. मोर्लेम गाव आधीपासूनच कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
आरोग्य विभागच करणार अंत्यसंस्कार..
या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्यामुळे, मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार या व्यक्तीवर राज्याचा आरोग्य विभागच अंत्यसंस्कार करणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
या व्यक्तीला कोरोनाव्यतिरिक्त दमा, मधुमेह आणि फुफ्फुसाचा गंभीर आजारही होता. गेल्या चार वर्षांपासून त्यामुळे ते अंथरुणाला खिळलेले होते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा : कोरोना रुग्णांच्या छायाचित्रीकरणावर बंदी; बंगळुरू पोलिसांचा निर्णय..