पणजी - गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात धुसफूस सुरु झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील कोरोना संसर्गाच्या व्यवस्थापनावर माध्यमांतून जी टीका होत आहे, त्यावर राज्यपालांनी नाराजी दर्शवली, असे वक्तव्य प्रमोद सावंत यांनी गुरुवारी केले होते. मात्र, असे म्हटले नसल्याचे राज्यपाल मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
सावंत यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री आणि राज्यपालात मतभेद निर्माण झाले आहेत. सांवत यांनी जे सांगितले, ते मी बोललो नसल्याचे मलिक म्हणाले. तसेच त्यांनी कोरोना व्यवस्थापनावरूनही भाजप आघाडी सरकारवर टीका केली. राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्यात काम करत असल्याचा विश्वास सावंत यांनी कालच्या(शुक्रवार) बैठकीत दिल्याचे राजभवनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यपाल मलिक यांची काल राजभवनात भेट घेवून कोरोेनाच्या प्रसारावर चर्चा केली. राज्यपालांनी सरकारला पूर्ण पाठिंबा दर्शवला, असे राजभवनने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. राज्यपालांच्या सुचनांवर सरकार कार्यवाही करेल, असे आश्वासन सावंत यांनी दिले होते, असेही पत्रकात म्हटले आहे.
या वादानंतर विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री सावत यांचा राजीनामा मागितला आहे. मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत असून सरकारचे अपयश झाकण्यासाठी खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. गोवा राज्यामध्ये 1 हजार 337 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे.