पणजी - भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) फोडला नसून पक्षात असुरक्षितता वाटल्याने त्यांच्या आमदारांनी वेगळा गट स्थापन करत भाजपमध्ये प्रवेश केला. तर सरकार स्थापनेवेळच्या अटी न पाळल्यामुळे सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज संध्याकाळी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. सावंत म्हणाले, सरकार स्थापनेवेळी मगोने शिरोडा पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करू नये, असे ठरले होते. तशी समज ढवळीकर यांना देण्यात आली होती. तर पक्षातील दोन आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत पक्षात असुरक्षितता, काढून टाकण्याची भीती वाटते, असे सांगून भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे बाबू आजगावकर आणि दीपक पावसकर यांना रात्रीच भाजप प्रवेश देण्यात आला.
सरकार टिकवण्यापेक्षा सुदिन ढवळीकर यांना भावाचा उद्देश मोठा वाटला असेल. त्यामुळे त्यांनी सरकारच्या सर्वमान्य कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले. शिवाय अगोदरच त्यांचे दोन आमदार सरकारला पाठिंबा देत असल्याने त्यांना मंत्रिपदावरून काढण्यात आले.
मगोच्या आजच्या बैठकीत लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यांनी उमेदवार उभे केले तर भाजपवर काही परिमाण होणार काय? असे विचारले असता डॉ. सावंत म्हणाले, आमचे लोकसभेचे दोन्ही आणि तिन्ही पोटनिवडणुकीचे उमेदवार निवडणून येतील.
दरम्यान, गुरुवारी (दि.२८) संध्याकाळी साडेचार वाजता सरकारच्यावतीने माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी कला अकादमी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी महाराज, तपोभूमीचे ब्रम्हेशानंद, चार राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी आणि सत्ताधारी पक्ष प्रमुख, अपक्ष यावेळी उपस्थित राहतील.