गोवा - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्रीकर यांच्या शरीरात होणारा अंतर्गत रक्तस्त्राव थांबला असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे ते म्हणाले.
डॉ. प्रदीप गर्ग हे पर्रिकर यांच्या तब्बेतीवर लक्ष ठेऊन आहेत. ते उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांना घरी कधी सोडणार हे आणखी डॉक्टरांनी सांगितले नाही.
मनोहर पर्रीकर हे मागील ३६ तासांहून अधिक काळ गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. रविवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास डॉ. गर्ग यांचे पथक गोमेकॉत दाखल झाले होते. तेव्हापासून ते पर्रीकर यांच्यावर नजर ठेवून आहेत. दरम्यान, आज सकाळी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष, गोवा भाजपचे संघटनमंत्री संतोष धोंड यांनीही पर्रीकर यांची भेट घेऊन तब्बेतीची चौकशी केली.
पणजीतील भाजप कार्यालयात भाजपने आज बैठक बोलावली आहे. त्याविषयी बोलताना सरचिटणीस सदानंद तानवडे म्हणाले, की ही पक्षाची पूर्व नियोजित बैठक होती. ही लोकसभा निवडणूक तयारीसाठी संचालन समितीची बैठक आहे. त्यामुळे यासाठी एखाद्य दुसरा आमदार उपस्थित राहू शकतो. मात्र, आमदारांची बैठक नाही. आज संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय प्रवक्त्या चित्रा लेखी दक्षिण गोव्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्या युवा मोर्चा कार्यकर्ते आणि काही संवाद साधणार आहेत.