नवी दिल्ली - ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीने कोरोनाविषाणूवर उपचार करण्यासाठी फॅव्हीपीरावीर हे औषध तयार केले आहे. फॅव्हीपीरावीर हे औषध करोना विषाणूवरील उपचारांमध्ये प्रभावी ठरत आहे. कंपनीने हे औषध फॅबीफ्लू या नावाने लाँच केले आहे.
भारतीय औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) कोरोनामुळे निर्माण झालेली आरोग्य आणीबाणी व वैद्यकीय आवश्यकतेचा विचार करून कंपनीला फॅव्हीपीरावीर ओषधी तयार करण्याची आणि विक्रीची परवानगी दिली आहे. देशातील सौम्य आणि मध्यम पातळीवर असलेल्या कोरोना रुग्णाच्या उपचारांसाठी औषधाच्या मर्यादित वापरास परवानगी देण्यात आली आहे.
औषधाच्या वापरास काही विशिष्ट अटींसह परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, औषधांच्या प्रभावीपणा आणि सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठी कंपनीला पहिल्या 1000 रूग्णांची देखरेख करावी लागेल. अद्याप चाचण्या सुरू असल्या तरी डीसीजीआयने औषध मंजूर केले आहे कारण, आतापर्यंतचे औषधाचे परिणाम प्रोत्साहनकारक आहेत.
औषध वापरास मंजुरी अशा वेळी आली आहे, जेव्हा भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा मोठ्या दबावाखाली आली आहे. फॅव्हीपीरावीरसारख्या औषधाच्या प्रभावी उपचारांच्या उपलब्धतेमुळे हा दाब मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ग्लेन सल्दान्हा यांनी व्यक्त केली.
ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेड या औषध कंपनीला एप्रिलमध्ये फॅव्हीपीरावीर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या घेण्याची परवानगी मिळाली होती. जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते. ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर करण्याची 2014 परवानगी देण्यात आली होती.