चेन्नई - अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णाद्रमुक) या राजकीय पक्षाचा अनधिकृत बॅनर अंगावर पडल्यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे. तेवीस वर्षांची ही तरुणी स्कूटीवरून जात असताना तिच्या अंगावर हा बॅनर पडला. सुबाश्री असे या तरूणीचे नाव आहे.
पल्लवरम-थोराईपकम या मार्गावरून ही तरुणी आपल्या घरी चालली होती. अचानक तिच्या अंगावर लग्नाच्या शुभेच्छा देणारा बॅनर कोसळला. त्यामुळे तोल जाऊन ती खाली पडली. हे सर्व इतके अचानक घडले, की तिच्या मागे असणाऱ्या पाण्याच्या टँकरला अचानक ब्रेकही लावता आला नाही, त्यामुळे तो ट्रक तिच्या अंगावरून गेला. त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषा चाचणी परिक्षा (आयईएलटीएस) देऊन ही सुबाश्री घरी येत होती. कॅनडामध्ये चांगली नोकरी मिळवण्याचे तिचे स्वप्न होते.
मद्रास उच्च न्यायालयाने २ वर्षांपूर्वीच बॅनरबंदी केली आहे. त्यामुळे, अण्णाद्रमुक न्यायालयाच्या आदेशाचे पालन का करत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. उच्च न्यायलय देखील ही गोष्ट मान्य करते आहे, की बॅनर बंदीच्या निर्णयाचे कोणताही पक्ष किंवा रा़जकीय नेता पालन करत नाही.
दरम्यान, सुबाश्रीच्या नातेवाईकांना भरपाई म्हणून पाच लाख रुपये देण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला दिले आहेत.
हेही वाचा : अंधश्रद्धेचा कळस! पाऊस थांबविण्यासाठी बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट