लखनऊ - भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याचे स्वप्न सरकार पाहत आहे, मात्र त्याचवेळी देशातील लोकांना अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजाही सरकार पुरवू शकत नाही हे विदारक सत्य आहे. सततच्या उपासमारीला कंटाळून उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये एका लहान मुलीने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यानंतर पंधरा दिवस मृत्यूशी चाललेली तिची झुंज अखेर काल (मंगळवार) तिच्यासोबतच संपली.
केवळ अर्ध्या चपातीसाठी पेटवून घेतले..
उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील मजलिसपूर गावातील ही घटना आहे. जवळपास पंधरा दिवसांपूर्वी केवळ अर्ध्या चपातीसाठी एका लहानगीने रॉकेल ओतून घेत, स्वतःला पेटवून घेतले होते.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील सगळ्यांच्या जेवणानंतर एक चपाती शिल्लक राहिली होती, ज्यासाठी तिचे तिच्या भावासोबत भांडण झाले. यामध्ये तिला चपातीचा हिस्सा न मिळाल्याने ती रागात होती. त्यानंतर तिचा भाऊ बाहेर खेळायला गेल्यानंतर तिने स्वतःला पेटवून घेतले.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा..
यावेळी मुलीचे आई-वडील घरी नव्हते. गावकऱ्यांनी तातडीने तिला जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यांना बाहेरून औषधे घेण्यास सांगितले. मुलीच्या वडिलांकडे ही औषधे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिला तसेच घरी आणण्यात आले.
बातमी पसरल्यानंतर प्रशासनाला जाग...
काही स्थानिक माध्यमांनी ही घटना उचलून धरली, त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर मुलीला पुन्हा रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले आणि तिच्यावर उपचार सुरु झाले. सोबतच, तिच्या कुटुंबियांना रेशनही देण्यात आले. त्यानंतर १५ दिवसांनी, काल (मंगळवार) उपचार सुरु असतानाच त्या मुलीचा मृत्यू झाला.
एकीकडे संपूर्ण देश दिवाळी सण साजरा करत आहे, पंतप्रधान देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याचे बोलत आहेत; तर दुसरीकडे त्याचवेळी देशातील नागरिकांना चपातीच्या तुकड्यासाठी जीव द्यावा लागतो आहे, ही शोकांतिका आहे.
हेही वाचा : तामिळनाडू : बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, मृतदेह हाती