नवी दिल्ली - बिहारच्या बेगूसराय येथून भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, सिंह यावर फारसे खूश नाहीत. ते नवादा येथून निवडणूक लढवू इच्छितात, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाह यांनी, ते बेगूसराय येथूनच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याला सीपीआयने (भाकप) अपेक्षेप्रमाणे बेगूसराय येथून उमेनदवारी दिली आहे. आरजेडीचे तन्वीर हसन हेही येथूनच लढणार आहेत. यामुळे येथे जोरदार संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.
गिरिराज सिंह यांच्या नाराजीनंतर त्यांना जागा बदलून दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाह यांनी ते बेगूसराय येथूनच लढतील, असे सांगत निर्णय कायम ठेवला. 'त्यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेतले आहे. पक्ष त्यांच्या सर्व समस्यांवर उपाय शोधून काढेल. मी त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो,' असे शाह यांनी म्हटले आहे.
गिरीराज सिंह हे सध्या नवादा येथील खासदार आहेत. ते याच जागेवरून निवडणूक लढवू इच्छित होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत ही जागा युतीमध्ये जेडीयूला देण्यात आली आहे.