जयपूर - राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचे प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणी पोलिसांच्या विशेष पथकाने दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसच्या आमदारांना पैसे देऊन फोडण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचाही जबाब नोंदवणार आहे.
काँग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे, असा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी केला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोघांचे वक्तव्य रेकॉर्ड करावेत, असे विशेष पोलीस पथकाने पक्षनेते (व्हिप) महेश जोशी यांना नोटीस दिली आहे. या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. गेहलोत सरकार पाडण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
इतर काँग्रेस नेत्यांचीही वक्तव्ये रेकॉर्ड करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलिसांना अटक केलेल्या दोन व्यक्तींच्या मोबाईलवरून आमदार फोडण्यासंबंधी काही धागेदोरे मिळाले आहेत. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत. यामागे भाजप नेते असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे.