विशाखापट्टणम - मी केवळ १२ वर्षांचा होतो, तेव्हापासून जातीय ऐक्याबाबत विचार करत आलो आहे, असे गांधीजी म्हणत. हिंदू, मुस्लीम आणि पारशी लोकांमध्ये एकता निर्माण करणे हे तरुणपणी त्यांचे स्वप्न होते. (वाचा - 'मोहनदास', राजमोहन गांधी) एका ब्रिटिश व्यक्तीने सुरू केलेली काँग्रेस, जिच्या पहिल्या अधिवेशनाचे (१८८५, बॉम्बे) अध्यक्षपद एका हिंदू व्यक्तीकडे; दुसऱ्या अधिवेशनाचे (१८८६, कलकत्ता) अध्यक्षपद एका पारशी व्यक्तीकडे, तिसऱ्या अधिवेशनाचे (१८८७, मद्रास) अध्यक्षपद एका मुस्लीम व्यक्तीकडे आणि चौथ्या अधिवेशनाचे (१८८८, अलाहाबाद) अध्यक्षपद पुन्हा एका ब्रिटिशाकडे होते, हा केवळ योगायोग नव्हता. त्यानंतरच्या काही वर्षांत हीच पद्धत चालू राहिल्याने, सांस्कृतिक बहुलता आणि धर्मनिरपेक्षतेचे एकत्रिकरण दिसून आले. इंडियन नॅशनल काँग्रेसचे संस्थापक अॅलन ऑक्टेव्हियन यांनी तरुणांना, स्वातंत्र्य आणि आनंदासाठी आत्मत्याग आणि नि:स्वार्थीपणा हेच दोन मार्ग असल्याचे सांगितले.
हेही वाचा : गांधीजींचे संवादकौशल्य आणि संज्ञापनातील गांधीवाद...
पोरबंदरच्या राजकोट शाळेमध्ये सांस्कृतिक बहुलता आणि मानवी आत्म्याचे ऐक्य अशा मूल्यांचे शिक्षण घेतलेला मोहनदास हा मुलगा. बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जाण्याआधी त्याने आईच्या चरणी झुकून शुद्धतापूर्ण आणि शिस्तीत जीवन जगण्याचे आश्वासन दिले. आपल्या आयुष्याच्या सुरुवातीचा, वीस वर्षांहून अधिक काळ गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत घालवला. यादरम्यान त्यांना बराच अपमान, शारिरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. आणि यामधूनच मोहनदासचे रुपांतर 'महात्मा' मध्ये झाले. १९०६ हा त्यांच्या आयुष्यातील आणि जगाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा. याच वर्षी आफ्रिकेमध्ये सत्याग्रहाचा उदय झाला. याचे वर्णन करताना एका कन्नड साप्ताहिकात रामचंद्र गुहा म्हणतात; 'कोणत्याही तलवारीशिवाय, कोणत्याही बंदुकीशिवाय गांधीजींनी दाखवलेले शौर्य आणि त्यामुळे असमानतेचा झालेला पराभव हा कशाहीपेक्षा कमी नाही.' याच लेखामध्ये शेवटी गुहा त्यांच्या आफ्रिकेतील मित्राने वापरलेले शब्द वापरतात, 'तुम्ही आम्हाला एक वकील दिलात, आम्ही तुम्हाला एक महात्मा दिला.'
गांधीजी जेव्हा मायदेशी परतले, तेव्हा देशात अनागोंदी माजली होती. आफ्रिकेमधील गांधीजींच्या कार्याची महती तेव्हा देशभरात पसरली होती. त्यांनी आल्याबरोबर त्यांची शस्त्रे काढली. जी होती, सत्याग्रह, अहिंसा आणि प्रेम. आणि नंतर जे घडले, त्याचा साक्षीदार अवघे जग होते. गांधीजींनी प्रेम, करुणा आणि क्षमा यांची ताकद पूर्ण जगाला दाखवून दिली. ते एकदा त्यांच्या रागात असलेल्या मुलाला देखील उपदेश देत म्हणाले होते, जर तुझ्यामते तुझ्या वडिलांनी काही चूक केली असेल, तर तू त्यांना माफ कर. त्यांची भेदक शांतताच त्यांच्या टीकाकारांना गप्प करण्यासाठी पुरेशी होती. त्यांना बुद्ध आणि येशू दोन्ही प्रिय होते. त्यामुळेच, कित्येक मिशनरींनी असे म्हटले आहे, की त्यांनी सेवाग्राममध्ये येशू पाहिला.
आजच्या सत्तेच्या वासनेने, संपत्तीचा अखंड लोभ, हिंसाचार, भ्रष्टाचार आणि वाढती दारिद्र्य यामुळे त्रस्त असलेल्या मानवतेसमोर हाच प्रश्न आ वासून उभा आहे, की भविष्यासाठी काही आशा आहेत का? याचे उत्तर गांधीजींनी ठेवलेल्या वारशामध्ये आहे. किंग्सले मार्टीन म्हणतात, "गांधीजींचे जीवन आणि मृत्यू या सत्यावर साक्ष देतील की माणूस अजूनही सत्य आणि प्रेमाद्वारे दु:ख, क्रौर्य आणि हिंसा यावर मात करू शकतो."
दरवर्षी गांधी जयंतीला, आपण त्यांच्या या शिकवणींवरील विश्वास अजून दृढ करतो, आणि एका चांगल्या भविष्याची आशा करतो.
हेही वाचा : आधुनिक प्रबोधनाचे नवे मार्ग शोधताना : गांधी आणि टागोर