नवी दिल्ली : "या पृथ्वीतलावर असा माणूस होता, यावर पुढच्या पिढ्या विश्वासच ठेऊ शकणार नाहीत.." असे उद्गार थोर शास्त्रज्ञ अल्बर्ड आईनस्टाईन यांनी महात्मा गांधींबद्दल बोलताना काढले होते.
गांधीजी 'महात्मा' उपाधीचा तिरस्कार करत. त्यांना कोणी महात्मा म्हणल्यास त्यांना काहीसे विचित्र वाटत. गांधीजी जरी इतर मानवांप्रमाणेच सामान्य असले, तरी त्यांच्या कार्याने त्यांना उच्चपदावर नेऊन ठेवले. या सर्वाला साथ दिली ती त्यांच्या मूळ स्वभावाने.
इतर सामान्य व्यक्तींप्रमाणेच गांधीजींनीही आपल्या आयुष्यात अनेक चुका केल्या. मात्र, जी गोष्ट त्यांनी इतरांपासून वेगळी करते ती म्हणजे, त्यांनी कधीही आपल्या चुकांची पुनरावृत्ती केली नाही. आयुष्याच्या प्रत्येक घटनेबद्दल आत्मपरिक्षण करण्याची त्यांना सवय होती. ते स्वतःचे परिक्षण करून स्वतःमधील दोष शोधत, असे दोष जे इतर कोणाला देखील दिसले नाहीत. ते फक्त आपल्या कृत्यांचेच नव्हे, तर आपल्या विचारांचे देखील परिक्षण करत. त्यांचा असा विश्वास होता, की जर आपण मनामध्येदेखील चुकीचे कृत्य केले, तर ते कोणाला दिसणार नाही असे नाही. देवाला ते दिसेलच. त्यामुळे स्वतःच्या चुका लक्षात येताच ते सर्वांसमोर त्यांची कबूली देत आणि प्रायश्चित्त म्हणून स्वतःला शिक्षा देखील देत. दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना त्यांनी एकदा स्वतःला शिक्षा म्हणून एक वेळच्या जेवणाचा त्याग केला होता.
पुढे त्यांनी स्वतःसाठी तयार केलेले नियम आपल्या साथीदारांवर आणि आश्रमात राहणाऱ्या सर्वांवर लागू केले. त्यामुळेच सत्याग्रह चळवळीमध्ये जेव्हा कधी काही चुकीची गोष्ट झाली तेव्हा गांधीजींनी त्याची शिक्षा स्वतःला दिली. उपोषणादरम्यान ते आपले सर्व लक्ष प्रार्थनेवर केंद्रीत करत, ज्याने त्यांना मनःशांती लाभत.
हेही वाचा : मृत्यू म्हणजे अतिशय प्रिय असा मित्र : महात्मा गांधी
साधारणपणे लोक दुसऱ्या व्यक्तींमधील चुका काढतात. मात्र गांधीजी हे स्वतःमधील चुका शोधत आणि त्या चुकांना 'हिमालयी चूक' म्हणत. म्हणजे हिमालयाएवढी मोठी चूक. 'हिमालयी चूक' हा त्यांनीच तयार केलेला शब्दप्रयोग. आपल्या चुकांना हिमालयाची उपमा देत, त्या चुका सर्वांसमोर कबूल करून, आणि त्यांबद्दल स्वतःला शिक्षा देऊनच त्यांनी नैतिकतेचा हिमालय सर केला.
यामुळेच ते एक कायम विकसीत होणारे व्यक्ती बनले. त्यांच्या सत्यांच्या प्रयोगांसह त्यांचे विचारदेखील बदलत आणि विकसित होत गेले. त्यामुळेच ते म्हणत, की लोकांना त्यांच्या शब्दांमध्ये जर कधी विसंगती आढळली, तर त्यांनी सर्वात नंतर बोललेल्या शब्दांवर विश्वास ठेवावा. स्वतःच्या कृतींबाबत आणि विचारांबाबात ते नेहमीच जागरूक होते. मात्र, तरीही जर कधी त्यांच्याकडून चूक झाल्यास, ती मान्य करण्यास ते कचरत नव्हते.
गांधीजींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, श्रद्धा आणि तर्क यांमधील त्यांनी साधलेला समतोल. ते केवळ तर्कशुद्ध संकल्पनांचा स्वीकार करत. सोबतच ते अत्यंत धार्मिक देखील होते. त्यांनी साधलेल्या समतोलाचे उदाहरण द्यायचे झाल्यास, ते थिओसॉफिकल सोसायटीच्या अनेक सदस्यांच्या विचारांमध्ये आवड दर्शवत, त्यांचे भारतीय विचार आणि तत्वज्ञानाला महत्त्व देणे बापूंना पसंत होते. तरीही, बापूंनी मेटाफिजिक्स आणि मृत्यू नंतरचे जीवन या त्यांच्या संकल्पनांवर कधीही विश्वास ठेवला नाही.
हेही वाचा : गांधीजींची स्वातंत्र्याची संकल्पना...
गांधीजींचा अस्पृश्यतेला असणारा विरोध हा तर्कसंगती आणि तर्कशास्त्रावर आधारित होता. तरीही, जिथे जिथे तर्कशास्त्र कमी पडले, तिथे त्यांनी श्रद्धेचा आधार घेतला. त्यांची देवावर अपार श्रद्धा होती. आणि त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येकामध्ये देवाचा अंश असतो. त्यांना असा विश्वास होता की जर सृष्टीकर्ता चांगल्या गोष्टीचे प्रतिनिधित्व करतो, तर तो लोकांना नक्कीच सर्वांच्या भल्याकडे नेईल. सत्यावर त्यांचा अपार विश्वास होता, आणि केवळ अहिंसेद्वारेच सत्यापर्यंत पोहोचता येते असे त्यांचे मत होते.
गांधीजी संतांच्या शिकवणी आणि धर्मग्रंथांचा आदर करत. त्यांचा असे मत होते, की संतांच्या आणि लोकांच्या उत्तम विचार आणि अनुभवातूनच हे तयार झाले आहे. मात्र ते या शिकवणींची तर्कशास्त्राद्वारे चाचणी घेत आणि केवळ त्याच शिकवणी स्वीकारत ज्या या चाचणीमध्ये यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळेच ते म्हणत, की जर कोणा हिंदू पंडिताने हे सिद्ध केले की वेदांमध्ये अस्पृश्यतेचा स्वीकार आणि पुरस्कार केला आहे, तर अशा वेदांना ते नाकारतील.
गांधीजींचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा व्यापक आणि समग्र होता. जगातील अनेक अर्थशास्त्रज्ञ असे मानत की अर्थशास्त्र हे विज्ञान आहे आणि त्याचा नैतिकतेशी काहीही संबंध नाही. मात्र, गांधीजी असे मानत, की नैतिकतेशिवायचे अर्थशास्त्र हे केवळ जगाला नुकसान पोहचवू शकते. त्याचप्रमाणे, गांधीजींच्या मते राजकारण आणि अध्यात्म या वेगवेगळ्या नाही तर एकमेकांशी संबंधीत गोष्टी आहेत. आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन समग्र असल्यामुळे, गांधीजी सार्वजनिक जीवन आणि राजकारणापासून दूर राहिले नाहीत. त्यांनी कोणतेही सार्वजनिक कार्यालय स्वीकारले नसले, तरी राजकीय विषयांमध्ये त्यांनी प्रचंड रस घेतला. आणि मानवतावादी मूल्यांवर आधारित राजकारणाला प्रोत्साहन देण्यासाठी धडपड केली.
गांधीजींनी कधीही कोणाला त्याचे शिक्षण, आर्थिक स्थिती, त्वचेचा रंग, जात किंवा पंथ यावरून वेगळी वागणूक दिली नाही. ते एक उत्कृष्ट श्रोते होते. त्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या कोणाचेही म्हणणे ते लक्षपूर्वक आणि संपूर्ण ऐकून घेत. साधारणपणे सामान्य राजकारणी हा ऐकण्याऐवजी ऐकवण्यावर भर देतो. मात्र गांधीजी याच्या अगदी उलट होते. त्यांनी कधीही आपल्या भाषणाची पूर्वतयारी केली नाही, किंवा कधीही लिहून आणलेल्या नोट्सचा आधार घेतला नाही.
हेही वाचा : आजची बेरोजगारी आणि गांधीवादी अर्थशास्त्राची गरज
ज्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक दिली, त्याचप्रमाणे प्रत्येक प्रकारच्या कामालाही ते समान महत्त्व देत. त्यांच्यासाठी कोणतेही काम छोटे किंवा मोठे नव्हते. जॉन रस्किनच्या 'अन्टू द लास्ट' या पुस्तकाचा गांधीजींवर मोठा प्रभाव पडला होता. त्या पुस्तकातील त्यांना आवडलेल्या सूचनांचे त्यांनी स्वतःच्या आयुष्यात देखील अनुकरण करुन पाहिले. यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहर, आणि तेथील ऐषोआरामाचे जीवन सोडून फिनिक्स या छोट्याश्या खेड्यात राहायला जाणे.
जेव्हा ते साबरमतीमधील आश्रमातून वर्ध्याजवळच्या सेवाग्राम आश्रमात रहायला गेले, तेव्हा त्यांनी आश्रमातील तरुणांना आजूबाजूच्या गावांमध्ये स्वच्छता करण्यास सांगितले. मात्र, त्यांना तसे सांगण्याआधी, त्यांनी स्वतः आश्रमातील शौचालये साफ करण्यास सुरुवात केली होती. तसेच, आश्रमातील लोकांना साधे कपडे वापरण्यास सांगण्यापूर्वी त्यांनी स्वतः केवळ एक धोतर वापरण्यास सुरुवात केली होती. आणखी एक उदाहरण म्हणजे, ग्रामोद्योग संघ सुरु करण्यापूर्वी त्यांनी स्वतः हस्तनिर्मित कागद आणि लेखनी वापरण्यास सुरुवात केली होती.
गांधीजींनी ज्या गोष्टींचा उपदेश केला, त्या गोष्टी आधी स्वतः अंमलात आणल्या. त्यामुळेच, त्यांचे आयुष्य हेच एक संदेश होते. आणि त्यामुळेच ते 'महात्मा' होते!
हेही वाचा : महात्मा गांधी : विज्ञानवादी की विज्ञान-विरोधी..?