पाटणा - गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीमध्ये, बक्सरचं मोठं योगदान राहिलं आहे. बक्सरच्या शाहबादमध्येच महात्मा गांधींनी आपल्या स्वातंत्र्यता आंदोलनाचा पाया रचला. या दरम्यान, गांधीजींनी बक्सरला पाच वेळा भेट दिली. ११ ऑगस्ट १९२१ला गांधीजींनी असहकार आंदोलनासाठी बक्सरला भेट दिली. तर, २५ एप्रिल १९३४ला त्यांनी सविनय कायदेभंगाच्या आंदोलनासाठी बक्सरला भेट दिली. याआधी १९९४, १९१७ आणि १९१९मध्येही ते बक्सरला गेले होते.
बक्सरमध्ये गेल्यानंतर, गांधीजींनी सगळ्यात आधी श्रीचंद मंदिराला भेट दिली होती. याच मंदिरातच एके काळी डॉ. राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, अनुग्रह नारायण सिंह असे दिग्गज नेते राहिले आहेत. मात्र, आज या मंदिराची पडझड झाली आहे.
१९१७च्या चंपारण आंदोलनापासून १९४२च्या चले जाव आंदोलनापर्यंत जेव्हा कधी गांधीजींनी बस्तरला भेट दिली, त्यांना मोठ्या प्रमाणात लोकांनी पाठिंबा दिला. अगदी महिलादेखील यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन, महिला आपल्या अंगावरचे दागिनेही त्यांच्या झोळीत टाकले होते.
रामशंकर तिवारी या एका स्थानिक नेत्याच्या कार्याने प्रभावित होऊन, गांधीजींनी कोरानसराई या गावाला भेट दिली. हे गाव जिल्हा मुख्यालयापासून ३० किलोमीटर लांब होते. तिथे त्यांनी स्थानिक नेत्यांची बैठक घेतली. या भेटीनंतर गांधीजी परत गेले. मात्र इकडे, स्थानिक नेत्यांनी दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खून केला, ज्यामुळे स्वातंत्र्यलढ्याच्या आगीत आणखी तेल ओतले गेले. या घटनेला कित्येक दशके लोटली आहेत. मात्र, या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना आजही या गोष्टीचा अभिमान वाटतो.
हेही पहा : चंपारणचे 'ते' आंदोलन, ज्यामुळे गांधी झाले 'महात्मा'...