इंफाळ - मणिपूरच्या थोऊबल जिल्ह्यामध्ये मंगळवारी चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. कांगलेई यावोल कान्बा लुप (केवायकेएल) या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
थोऊबल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोईबाम इबोमचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. केवायकेएल या बेकायदा संघटनेचे ते सक्रिय सभासद होते. त्यांची चौकशी करण्यात आल्यावर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली, की त्यांना म्यानमारमध्ये ४५ दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात आले होते.
मणिपूरमध्येच सुरू झालेल्या या संघटनेने पोलिसांपासून लपून राहण्यासाठी शेजारच्या देशामधील डोंगराळ प्रदेशांमध्ये आपले तळ उभारले आहेत. दरम्यान, या चारही दहशतवाद्यांकडून आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हेही वाचा : मऱ्हाठमोळे मनोज नरवणे लष्करप्रमुखपदी, आज स्वीकारला कार्यभार