नवी दिल्ली - पाकिस्तातून भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे आणि नियंत्रण रेषेचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. यासाठी सीमेवरील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. मात्र, यानंतर पाकिस्तानकडून कमी उंचीवरून उडणाऱ्या ड्रोन्समधून शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थ भारतात अवैधरीत्या पाठविण्यास सुरुवात झाली आहे. कमी उंचीवरून उडत असल्याने ही ड्रोन्स रडारलाही सापडत नाहीत. यावर उपाय म्हणून नुकतीच अशी ड्रोन्स आढळून आल्यास ती पाडण्याची परवानगी सुरक्षा दलांना मिळाली आहे.
या ड्रोन्समुळे देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत आहे. मात्र, ती रडारला सापडत नसल्याची मुख्य समस्या आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) विक्रम सिंह यांनी या ड्रोन्सना शोधून काढण्यासाठी अत्याधुनिक संशोधन केंद्र स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. सिंह यांची ईटीव्ही भारतने विशेष मुलाखत घेतली.
सीमा सुरक्षा दलांच्या जवानांनी अनेकदा पाकिस्तानी ड्रोन्स भारतीय सीमेच्या आत घुसखोरी करत असल्याचे पाहिले आहे. नुकतेच ९ ऑक्टोबरलाही असे ड्रोन नजरेस पडले.
सरकारने केवळ सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) किंवा भारतीय हवाई दल, आसाम रायफल्स, भारत-तिबेट सीमा पोलीस तसेच, इतरही सुरक्षा दलांनीही ड्रोन शोधून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी संघटित होऊन योजना तयार करणे आवश्यक आहे.
नुकत्याच सौदी अरबमधील दोन प्रमुख तेल विहिरींवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांचेही सिंह यांनी उदाहरण दिले. पाकिस्तानद्वारे वापरण्यात येणारे ड्रोन्स एके-47, सॅटेलाइट फोन आणि नकली नोटा, 10 किलोग्रॅम वजनापर्यंतची शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत, असे ते म्हणाले.
पाकिस्तानही सौदी अरबची सरकारी तेल कंपनी अरामकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यासारखाच हल्ला भारतावरही करू शकतो. यामुळे सावध राहाणे आणि वेळीच योग्य ती पावले उचलणे आवश्यक असल्याचे सिंह म्हणाले.