गुवाहाटी (आसाम) - राजकीय नेते आणि बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुरा या राज्यांचे माजी राज्यपाल देवानंद कोणवार यांचे आज निधन झाले. गुवाहाटीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते 77 वर्षांचे होते. वयोवृद्ध झाल्याने अनेक व्याधींनी ते ग्रस्त होते, असे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
1943 मध्ये आसामच्या शिवासागर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. इंग्रजी शिक्षक म्हणून त्यांनी हिस्टोरिक कॉटन कॉलेज गुवाहाटी येथून त्यांनी करिअरला सुरुवात केली. काही काळानंतर राजकारणात उतरत काँग्रेस पक्षात ते दाखल झाले. आसाममध्ये 1991 मध्ये मुख्यमंत्री हितेशवर सायकिया आणि 2001 मध्ये मुख्यमंत्री तरुण गोगई यांच्या मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. शिवासागर जिल्ह्यातील थाओरा मतदारसंघातून ते तीन वेळा निवडून आले होते.
2009 साली त्यांच्याकडे बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यात वर्षी पश्चिम बंगालचेही राज्यपाल म्हणून त्यांना नेमण्यात आले. पाच वर्षानंतर त्यांना त्रिपुराचे राज्यपाल करण्यात आले. आसामचे मुख्यमंत्री सरबानंदा सोनोवाल यांच्यासह राजकीय नेते, कोणवार कुटुंबीय यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.