श्रीनगर - परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांचे पथक आज(बुधवार) जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आले आहे. यामध्ये युरोपीयन संघाचे सदस्यही सहभागी आहेत. २५ सदस्यांचे हे पथक जम्मू काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले आहे. यामध्ये जर्मनी, कॅनडा, फ्रान्स, अफगाणिस्तान या देशांतील प्रतिनीधींचा समावेश आहे.
५ ऑगस्टला काश्मीरची स्वायत्ता काढून घेण्यात आल्यानंतर खोऱ्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. संपर्क व्यवस्था आणि नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आली आहेत. अनेक राजकीय नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्याासाठी पथक काश्मीरमध्ये आले आहे. श्रीनगरला पोहचल्यावर सर्वजण उत्तर काश्मीरमधील फळांची शेती आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा करणार आहे. तसेच स्थानिक राजकीय नेत्यांबरोबरही संवाद साधणार आहेत.
काश्मीरमध्ये तैनात असलेले लष्करी अधिकारी प्रतिनिधींना सुरक्षेसंदर्भातील परिस्थितीचीही माहिती देणार आहे. पाकिस्तान कशा प्रकारे काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत आहेत यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
युरोपीयन युनियनने नुकतेच काश्मीरविषयी ठराव मांडला होता. यावेळी काश्मीरमधील परिस्थितीची चर्चा करण्यात आली होती. यावेळी ठरावावर मतदान होणार होते. मात्र, मतदान झाले नाही. या पार्श्वभूमीवर पोलंड, बल्गेरिया, चेक रिपब्लिक या युरोपीयन संघातील देशांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या अधिकाऱ्यासह १५ देशांच्या अधिकाऱ्यांनी काश्मीरला भेट दिली होती. यामध्ये व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, नायजर, नायजेरिया, मोरक्को, गुआना, अर्जिंटीना, फिलीपाईन्स, नॉर्वे, मालदीव, फिजी, टोगो, बांगलादेश, पेरू या देशांचा समावेश होता. येत्या काही दिवसांत काश्मीर मधील स्थिती सुधारण्याती आशा यावेळी सदस्यांनी व्यक्त केली होती. तसेच पाहणीनंतर समाधान व्यक्त केले होते.