श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाचा 'संविधान दिन' आज साजरा करण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीरचा स्वतंत्र दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्यात आले. त्यामुळे जम्मू व काश्मीरची 1957 पासून स्वतंत्र असलेली घटनाही संपुष्टात आली आहे .
देशभरासह जम्मू आणि काश्मीरमध्येही संविधान दिन साजरा केला जाणार आहे. संविधान तयार करणाऱ्यांचे योगदान लक्षात येण्यासाठी आणि उच्च पातळीवरील मूल्यांची नागरिकांमध्ये जाणीव होण्यासाठी 26 नोव्हेंबर हा 'संविधान दिवस' म्हणून पाळण्यात येणार आहे. हे वर्ष म्हणजे संविधानाच्या स्वीकृतीचा 70 वा वर्धापन दिन असल्याचे जम्मू आणि काश्मीरच्या सामान्य प्रशासनाचे अतिरिक्त सचिव सुभाष सी. छिब्बर यांनी आदेशात म्हटले आहे.
सर्व सरकारी विभागांच्या कार्यालयामध्ये घटनेच्या प्रस्तावनेचे सकाळी 11 वाजता वाचन करण्यात येणार आहे. त्यानंतर मुलभूत कर्तव्याची अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात येणार आहे. यासदंर्भात सर्व विभागीय आयुक्त, उपआयुक्त, सर्व विभागप्रमुखांसह सर्व पोलीस प्रमुखांना छिब्बर यांनी आदेश दिले आहेत.
हेही वाचा-संविधान, लोकशाही अन् इतर गोष्टींवर अश्विनी कुमार यांच्यासोबत विशेष चर्चा..
26 नोव्हेंबर 1949 ला देशाने राज्यघटनेचा स्वीकार केला. त्यानंतर त्याची 26 जानेवारी 1950 पासून अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे प्रजासत्ताक देश असलेल्या भारताच्यादृष्टीने संविधान दिनाचे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे.