नवी दिल्ली - संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. याकाळात गरीब, हातावर पोट असलेली जनता उपाशी राहणार नाही, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर समाजभान जागृत असलेले काही लोक स्व:ताहून पुढे येत गरिबांसाठी खाण्या-पिण्याची सोय करत आहेत. अशाप्रकारेच दिल्लीत दोघे भाऊ रोज 25 किलोमीटर अंतर कापत गरिबांना अन्नदान करण्यासाठी जातात.
दक्षिण दिल्लीच्या बिजवासनचे असलेले सोनू आणि रवी मिसाल हे दोघे भाऊ एआयआयएमएसच्या परिसरात राहत असलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करत आहेत.
कोरोना महामारीमुळे देशाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत असे काही लोक आहेत, ज्यांच्या दोन वेळच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी परिस्थिती चांगली असलेल्या लोकांनी पुढे येऊन कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे सोनू आणि रवी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.