बंगळुरू(म्हैसूर) - भारतात विविध प्रजातींचे साप आढळतात. प्रामुख्याने सापांची वर्गवारी ही विषारी आणि बिनविषारी या दोन गटांमध्ये केली जाते. या वर्गवारीला छेद देणाऱ्या काही सापांच्या प्रजातीही अस्तित्त्वात आहेत. म्हैसूरमध्ये असाच एक उडणारा साप आढळला आहे. हा साप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारू शकतो.
सामान्यपणे सर्व प्रकारचे साप हे सरपटणारे असतात मात्र, म्हैसूरमध्ये सापडलेला हा साप हवेतून प्रवास करू शकतो. चार फूट लांब असलेल्या हा साप म्हैसूरमधील वेंकट रामू यांच्या घरी आढळला. त्यानंतर रामू यांनी स्थानिक सर्पमित्र शिवू याला बोलावले. शिवू या सापाला पकडण्याचा प्रयत्न करत असताना साप अचानक उडून दिसेनासा झाला.
सर्पतज्ञांच्या मते, उडणारे साप विषारी नसतात. सामान्यपणे अशा प्रकारचे साप घनदाट जंगलात आढळतात. झाडांवर उड्या मारून पक्ष्यांची अंडी खाण्याचे काम हे साप करतात.