बंगळुरू - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबरोबरच देशासमोर आता आणखी एक संकट येऊन उभं ठाकलं आहे. बिहार, आसाममधील महापुरानंतर आता दक्षिण भारतामध्येही मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने केरळात आणि कर्नाटकातील 7 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे येथील नद्यांनाही पूर आला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील मुल्लापेरियार जलाशयातील पाण्याची पातळी रविवारी रात्री उशिरा 136 फुटांपर्यंत पोहोचली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इडुक्कीच्या मुल्लापेरियार जलाशयातील पाणी पातळी वाढ झाल्याने वैगाई धरणात बोगद्याद्वारे पाणी सोडण्याच्या संदर्भात इडूक्की जिल्हाधिकाऱ्यांनी तामिळनाडूतील थेनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. 'पाण्याची पातळी 136 फुटांवर गेली आहे. मी थेनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे इडुक्कीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगतिले. आपत्कालीन परिस्थितीत लोकांना हलविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व व्यवस्था केल्याचे ते म्हणाले.
राज्यात विशेषत: इडुक्की जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुल्लापेरियारमध्ये पाण्याची पातळी सतत वाढत आहे. 3 ऑगस्टला पाण्याची पातळी 116.20 फूट होती, 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2.25 वाजता 131.25 फूटपर्यंत पोहोचली होती. सध्या धरणाची आवक 13,257 क्युसेक इतकी असून बोगद्यातून पाणी सोडण्याचे प्रमाण 1,650 क्युसेक आहे, असे केरळचे मुख्य सचिव विश्वास मेहता यांनी तामिळनाडू सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
केरळच नव्हे तर कर्नाटकातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या किनारपट्टी भागात येत्या 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर आज दिल्लीसह देशातील बर्याच राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.