मुंबई - मागील १० दिवसात दक्षिण-पश्चिम भागात मान्सूनने चांगली प्रगती केली आहे. याभागात चांगला पाऊस पडत आहे. परंतु, यातुलनेत पूर्व, मध्य आणि दक्षिण भागात पावसाचे प्रमाण सरासरी आहे. उत्तर भागात मान्सूनने (एनएमएल) जून २० ते जून २५ पर्यंत चांगली प्रगती केली आहे. ही वेळ जूनमधील मान्सूनचा प्रगतीसाठी सर्वात चांगली होती, असा अहवाल स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिला आहे.
मुंबईत पडणार जोरदार पाऊस, पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता
३ जुलै ते ५ जुलै या कालावधीत मुंबईत २०० मिलीमीटरच्या जवळपास पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जून महिन्यात शहरात चांगला पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे चेन्नईमध्ये अजूनही चांगला पाऊस झाला नाही. गेल्या काही दिवसांपासून शहराला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात सरासरीपेक्षा पाणी कमी आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाहीतर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
देशातील जलसाठ्यात पाण्याचा तुटवडा
उत्तर भागात महिन्यात सलग ५ दिवस मान्सूनने प्रगती केल्यानंतर, २५ जूननंतर ३ दिवस (एनएलएम) मान्सूनची प्रगती दिसून आली नाही. एनएलएम सध्या द्वारका, अहमदाबाद, भोपाल, जबलपूर, पेंद्रा, सुलतानपूर, लखिमपूर आणि मुक्तेश्वर या भागात स्थिरावला आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे देशातील जलसाठ्यात तुटवडा जाणवत आहे. देशातील प्रमुख ९१ जलसाठ्यापैंकी ८६ जलसाठ्यात ४० टक्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. दक्षिण भारतात जलसाठ्यांची स्थिती बिकट आहे. ३१ प्रमुख जलसाठ्यांपैकी ३० जलसाठ्यांमध्ये ४० टक्यांपेक्षा कमी साठा आहे.
जून ३० ते जुलै १५ कालावधीत मध्य भारतात चांगला पाऊस पडणार
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे जून ३० ते जुलै १५ पर्यंत या कालावधीत ओडिशा, आंध्रप्रदेशचा किनारा, दक्षिण छत्तिसगढ, उत्तर तेलंगणा, दक्षिण मध्यप्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, दक्षिण राजस्थान आणि गुजरातमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
३० जूनपूर्वी पेरणीसाठी चांगला कालावधी
३० जूननंतर चांगल्या पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱयांनी याआधीच पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यावेळी पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचेही सांगण्यात आले आहे. याकाळात उभ्या पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, यावेळी पिकांवर रोगराई पसरण्याचा धोकाही असल्याचेही स्कायमेटकडून सांगण्यात आले आहे.