नवी दिल्ली - चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील पाच जणांचे अपहरण केल्याचे अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसचे आमदार निनोंग एरिंग यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी टि्वट केले आहे. दरम्यान, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून या घटनेमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
'धक्कादायक बातमी, अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील पाच नागरिकांचे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) अपहरण केले आहे. काही महिन्यांपूर्वीही अशीच घटना घडली होती. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या कारवायांना योग्य उत्तर दिलेच पाहिजे', असे टि्वट त्यांनी केले आहे. त्यांनी हे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केले आहे. निनोंग एरिंग यांनी चीनने अपहरण केलेल्या नागरिकांची नावेही शेअर केली आहेत. तानू बाकर, प्रसात रिंगलिंग, नागरू दिरी, डोंगटू इबिया आणि टोच सिंगकाम अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान, चीन आणि भारतादरम्यान गेल्या काही महिन्यांपासून सीमावाद सुरू आहे. 15 जूनला झालेल्या संघर्षात 20 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर भारताने कारवाई करत चीनच्या अॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर सीमेवरील तणाव निवाळण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चेस प्राधान्य दिले होते. मात्र, चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच चीनने पुन्हा 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिण सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. भारतीय लष्काराने सीमेवरील उंच भागात सैन्याला तैनात केले आहे. त्यामुळे भारत या परिसरातील चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.