नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे मोठा अपघात झाला आहे. शनिवारी रात्री ट्रक पलटी झाल्यामुळे पाच स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे मजूर तेलंगणातील हैदराबाद येथून उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी जात होते.
आंब्याने भरलेला हा ट्रक हैदराबादमधून आग्रा येथे एकूण 18 जणांना घेऊन जात होता. यात दोन ड्रायव्हरसह एकूण 18 लोक होते. या 18 पैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे, असे नरसिंहपूर जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यापूर्वी महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी निघाले होते. दरम्यान प्रवासात ते औरंगाबादपर्यंत आले होते. रात्र झाल्याने सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला होता.
लॉकडाऊन सुरू होऊन बरेच दिवस झाले. परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ राज्यात परतायला सुरुवात करत आहेत. लॉकडाऊनमुळे मजुरांची गैरसोय होत आहे. हातावर पोट असलेले हे मजूर आपल्या घराचं ओढीनं मैलोनमैल प्रवास करत आहेत.