गाझीयाबाद - शहरातील नंदग्राम कृष्ण कुंज येथील गटाराची सफाई करताना 5 कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, कर्मचाऱ्यांचे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
गटार साफ करण्यासाठी 2 कर्मचारी आतमध्ये गेले होते. बराचवेळ झाल्याने ते बाहेर न आलेले पाहून इतर 2 कर्मचारी गटारात उतरले. दरम्यान, सफाई करण्यासाठी आत गेलेल 4 कर्मचारी बाहेर न आल्यामुळे 5 वा कर्मचारीही आत गेला. आतमध्ये विषारी वायू असल्यामुळे गुदमरून 3 कर्मचाऱ्यांचा आतच मृत्यू झाला तर इतर 2 कर्मचाऱ्यांचा रुग्णालयात जाताना मृत्यू झाला आहे.
शहरातील नंदराम वार्ड क्रमांक 11 च्या नगरसेवक माया देवी यांनी हा अपघात आपल्या वार्डात झाल्याचे सांगितले आहे. जलविभागाकडून येथे काही काम करण्यात येत होते. गटारामध्ये विषारी वायू झाला होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.