नवी दिल्ली - भारत सरकारने जम्मू काश्मीरविषयी घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तामध्ये चांगलाच रोष असल्याचे दिसत आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानी सैन्याच्या 3 जवानांचा खात्मा केला. यासंदर्भातील बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
आज (गुरुवारी) दुपारी उरी आणि राजौरी येथे पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी पाकिस्तानकडून मोठा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानने भारताचे 5 जवान मारल्याचा दावा केला आहे. मात्र, पाकिस्तानचा हा दावा खोटा असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे.
मंगळवारी रात्री पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीर सीमेवर मोठा गोळीबार करण्यात आला होता. याचा फायदा घेत काही दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला होता. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.