भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आयपीसी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दटिया जिल्हा दंडाधिकारी अरविंद महोर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नहर सिंह यादव यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडी भागात बैठक बोलावण्यासंबंधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. यावेळी दंडाधिकाऱ्यांनी १०० जणांच्या उपस्थितीसाठी परवानगी दिली होती. मात्र, या बैठकीला सुमारे दोन ते अडीच हजार लोक उपस्थित राहिले, असे महोर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
मध्यप्रदेशमध्ये २८ विधानसभा जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. तीन नोव्हेंबरला यासाठी मतदान पार पडेल, आणि १० नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यासाठी उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर आहे. मार्चमध्ये २२ काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आली होती. या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका पार पडणार आहेत.
हेही वाचा : देशातील ७४ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार न्यूज चॅनेल बनलेत मनोरंजनाचे साधन