नवी दिल्ली - देशातील विविध मुद्यांवरून काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज बेरोजगारीवरून मोदींवर निशाणा साधला. 'मोदी सरकार रोजगार द्या, देशातील तरुणांच्या समस्येवर तोडगा काढा', असे टि्वट राहुल गांधींनी केले.
राहुल गांधी यांनी एका वाहिनीचे वृत्त शेअर करत, मोदींवर निशाणा साधला. ऑगस्ट महिन्यामध्ये बेरोजगारीचा दर वाढून 8.4 वर पोहचला आहे. देशात लेबर फोर्सची संख्या 42.4 कोटी होती. ती ऑगस्ट महिन्यामध्ये 42.8 झाली आहे, असे संबधित वृत्तामध्ये म्हटलं आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून राहुल गांधी देशाची अर्थव्यवस्था, कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अमेरिका-चीनमधील तणावाच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर टीका करत आहेत. राहुल गांधींनी घसरलेल्या जीडीपीवरून मोदींवर टीका केली होती. देश सहा समस्यांना सामोरे जात असून या समस्या म्हणजे मोदी सरकारने तयार केलेले संकट असल्याचे गांधींनी म्हटले होते.