सोनीपत - केंद्र सरकारकडून काही महिन्यांपूर्वी सुधारीत शेतकरी कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र या कायद्यांना शेतकऱ्यांकडून विरोध सुरू आहे. हे कायदे रद्द करावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत. कायदे रद्द करावेत या मागणीसाठी पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांकडून सातत्याने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा फटका पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या फळ आणि भाजीपाल्याच्या पुरवठ्याला बसला आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे घाऊक बाजार पेठेत होणारा फळ आणि भाज्यांचा पुरवठा खंडित झाला आहे. अशियातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या आझादपूर बाजारपेठेत देखील भाज्यांची आवक मंदावली आहे. हे आंदोलन असेच सुरू राहिल्यास किंमती अत्यंत वेगाने वाढण्याचा आंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने दूध, फळे, भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तू खराब होऊन नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.