मुंबई - तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये मागील ७१ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्याप या प्रश्नावर कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, आंदोलनाचे पडसाद जागतिक स्तरावर उमटायला लागले असून परदेशातून यावर मत होऊ लागले आहे. अनेकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पॉप गायिका रिहाना सह पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थूनबर्ग ने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
रिहानानंतर अमेरिकेच्या उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले आहे. मीना हॅरिसने लिहिले आहे की, आपण सगळ्यांनी भारतात इंटरनेट शटडाऊन आणि शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा हिंसाचार याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. ट्विटरवरून गेल्या २४ तासांत रिहानाच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलेय की, भारताच्या संसदेने व्यापक चर्चा आणि संवादानंतर कृषी क्षेत्राच्या संबंधित सुधारणा करणारे कायदे मंजूर केले आहेत. हा कायद्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लवचिकता आणि मोठी बाजारपेठ मिळू शकेल. ही सुधारणा आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत शेतीचा मार्ग आहेत. भारतातील काही भागातील शेतकऱ्यांचा छोटा गट या सुधारणांशी सहमत नाही. भारत सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद सुरू केला आहे. या प्रयत्नात आतापर्यंत अकरा फेऱ्या झाल्या आहेत. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री सहभाग घेत आहेत, केवळ सरकारच नाही,तर पंतप्रधानांकडूनही कृषी कायद्याला स्थगित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करताना #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropagenda हा हॅशटॅग वापरला आहे.
सचिन तेंडुलकरचे ट्विट
![सचिन तेंडुलकर ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10493189_sf.jpg)
माजी क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही हॅशटॅग वापरत ट्विट केले आहे. भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. भारतात जे काही घडत आहे, बाहेरील शक्ती त्याचे प्रेक्षक होऊ शकतात. परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यावा, चला एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया. असे आवाहन सचिन तेंडुलकरने केले आहे.
लता मंगेशकर यांचे ट्विट
![लता मंगेशकर ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10493189_fsdf.jpg)
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सरकारच्या भूमिकेचे स्वागत करत म्हटलेय की, "भारत एक गौरवशाली राष्ट्र आहे. एक भारतीय म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की, एक राष्ट्र म्हणून आम्ही कोणत्याही समस्या किंवा अडचण जनहिताच्या भावनेने सोडविण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. जय हिंद असे सांगत त्यांनीही या दोन हॅशटॅगचा वापर केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहलीचे ट्विट
![विराट कोहली ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10493189_sdfdf.jpg)
"मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकत्र राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की सर्व बाजूंनी एक समाधानकारक तोडगा काढला जाईल जेणेकरून शांतता टिकेल आणि आम्ही सर्वजण पुढे जाऊ असे त्याने म्हटले आहे.
गायक कैलाश खेर
भारताची जगभरात ताकद वाढत असताना विरोधक कोणत्याही थराला जाऊ शकतात. कोरोनाच्या दुखद काळात भारत इतर देशांना मानवतेच्या भावनेतून लसीकरणास मदत करत आहे. भारत हा एकजूट असून देशाविरोधातील कमेंट्स सहन केल्या जाणार नाहीत, असे ट्विट गायक कैलास खेर यांनी केला आहे.
अभिनेता अक्षय कुमार
शेतकरी हा देशातील महत्त्वाचा घटक आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जे दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी एकमताने पर्याय शोधुया, असे ट्विट अभिनेता अक्षय कुमार याने केला आहे.
अभिनेता सुनील शेट्टी याचे ट्विट
एखाद्या गोष्टीचा आपण सर्व बाजूंनी विचार करायला हवा. कारण, अर्धसत्यापेक्षा दुसरी भयंकर गोष्ट दुसरी कोणतीही नाही.