हजारीबाग - गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना सतावणारी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे संसाधनांची कमतरता. मशागत, बी- बीयाणे, खते याचा खर्च गरीब शेतकऱ्याचे पुरते कंबरडे मोडतो. मात्र, झारखंड राज्यातील एका शेतकऱ्याने या सर्व अडचणींवर रडत न बसता उत्तर शोधले आहे. शेतीची मशागत ट्रक्टर किंवा बैलांनी करणे परवडत नसल्याने या शेतकऱ्याने चक्क मशागत करण्याचे यंत्रच बनवले.
महेश करमाळी या शेतकऱ्याने जुन्या स्कूटर पासून मशागतीचे यंत्र बनवले आहे. या यंत्राला स्कूटरचा हॅन्डल बसवण्यात आला आहे. लोखंडाचे तुकडे एकमेकांना जोडून त्याने हा अविष्कार साधला आहे. हे यंत्र बनवण्यासाठी त्याला फक्त १० ते १२ हजार रुपये खर्च आला. माझ्याकडे शेतीची मशागत करण्यासाठी ट्रकर किंवा बैल नाहीत. पण शेती करावीच लागेल, अशा गरीब परिस्थितीमुळे मला हे यंत्र बनवण्याची प्रेरणा मिळाल्याचे महेशने सांगितले.
महेश करमाळी हा हजारिबाग जिल्ह्यातील उच्चधना खेडेगावातील रहिवासी आहे. महेश राहतो त्या गावामध्ये अनेक शेतकरी गरीब आहेत. त्यांना ट्रक्टर किंवा बैलही शेतीच्या मशागतीसाठी परवडत नाही, अशा परिस्थितीत महेशने बनवलेले कमी पैशातील यंत्राची परिसरात वाहवा होत आहे. अनेक लोक हे यंत्र पहायला आसपासच्या खेडेगावांतून गर्दी करत आहेत. शासनाने या मशागत यंत्राची दखल घेऊन इतर शेतकऱ्यांनाही ते उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.