नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी आज (शुक्रवार) मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात आयोजित केलेल्या शेतकरी संमेलनाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी मोदींनी नव्या कृषी कायद्यांवरही मत व्यक्त करत विरोधकांवर हल्लाबोल केला. 'शेतकऱ्यांसाठी जे कायदे नुकतेच मंजूर झाले आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे. मात्र, हे कृषी कायदे एका रात्रीत तयार झाले नाहीत. मागील २० -२५ वर्षांपासून अनेक राजकीय पक्षांनी, कृषी तज्ज्ञांनी आणि आधुनिक शेतकऱ्यांनी ह्या सुधारणांची मागणी केली होती, असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली.
श्रेय घ्या, मात्र, शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका - मोदी
ज्या पक्षांनी शेती सुधारणा आपल्या घोषणा पत्रात लिहल्या होत्या. त्यांना सुधारणांवर कधी काम करता आले नाही. त्यांनी शेतकऱ्यांना प्राधान्य दिले नाही. जुन्या राजकीय पक्षाचे घोषणापत्र पाहिले तर आता जे कृषी सुधार झाले ते आत्ता आम्ही केलेल्या सुधारणांपेक्षा काही वेगळ्या नाहीत, असे मोदी म्हणाले. केंद्र सरकाराने शेतकऱ्यांशी मिळून काम केले आहे. सर्वांनी शेती क्षेत्रात सुधारणांची मागणी केली होती. त्याच सुधारणा आम्ही केल्या असे मोदी म्हणाले.
कृषी कायद्यांत सुधारणा झाली त्याचे विरोधकांना काहीही नाही. फक्त मोदींना ह्या सुधारणा करणे कसे शक्य झाले हा प्रश्न त्यांना पडला आहे. मोदींना शेती सुधारणांचे श्रेय मिळू नये, म्हणून विरोधक प्रयत्नशील आहेत. शेती सुधारणांचे सर्व श्रेय तुम्ही घ्या, मात्र, शेतकऱ्यांची दिशाभूल करणे सोडा, असे मोदी म्हणाले. हे कायदे येऊन सहा-सात महिने झाले आहेत. मात्र, आता यावर राजकारण केले जात आहे. विरोधक शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून हल्ला करत आहे. कायद्यात काय सुधारणा करायच्या यावर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. मात्र, विरोधकांकडे याचे ठोस उत्तर नाही, असे मोदी म्हणाले.
मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना १६ हजार कोटी दिले
मध्यप्रदेशातील ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १६ हजार कोटी हस्तांतरीत करण्यात आल्याचेही मोदी म्हणाले. भारताने मागील चार-पाच वर्षात जी आधुनिक व्यवस्था निर्माण केली आहे. त्याची जगात चर्चा होत आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डची सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चासाठी पैसे मिळाले. खासगी कर्जापासून शेतकऱ्यांना सुटका मिळाली.
शेतकरी कितीही कष्ट करो, शेतमालाची योग्य साठवण झाली नाही, तर त्याचे मोठे नुकसान होते. फक्त शेतकऱ्यांचे नाही तर ते देशाचेही नुकसान असते. हजारो टन शेतमाल दरवर्षी वाया जातो. आधीच्या सरकारांची यावर उदासीनदा होती. कोल्ड स्टोरेज (शीतगृह) आणि अन्नप्रक्रिया करण्यासाठी व्यावसायिकांनी पुढे येण्याची गरज आहे. भारताचा शेतकरी आता पिछाडीवर राहणार नाही. जगातील बड्या देशातील शेतकऱ्यांना ज्या सुविधा उपलब्ध आहेत. त्या आता भारतातील शेतकऱ्यांनाही मिळतील. जागतिक स्तरावर भारतातील शेतकरी आता असहाय्य राहणार नाहीत. जे काम २५ -३० वर्षांपूर्वी व्हायला हवे होते. ते आता होत आहे, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
धुळ खात पडलेला स्वामीनाथन आयोग आम्ही लागू केला
मी शेतकऱ्यांसमोर विरोधकांची पोल खोल करणार आहे. शेतकऱ्यांना बाता मारणारे लोक, खोटे अश्रू ढाळणारे लोक किती निर्दयी आहेत, याचा पुरावा स्वामीनाथन अहवाल आहे. विरोधकांनी आठ वर्ष स्वामीनाथन आयोगाचा अहवाल दाबून ठेवला. शेतकऱ्यांवर जास्त खर्च होऊ नये, म्हणून त्यांनी हा अहवाल दाबला. आमचे सरकार शेतकऱ्यांसाठी समर्पित असून शेतकऱ्यांना अन्नदाता मानते. काँग्रेस सरकारांनी केलेल्या कर्जमाफी हा शेतकऱ्यांना धोका आहे. धुळ खात पडलेला स्वामीनाथन आयोग आम्ही लागू केला, असे मोदी म्हणाले.
काँग्रेसची कर्जमाफीची घोषणा फक्त मतांच्या राजकारणासाठी -
मध्यप्रदेशात काँग्रेसने शेतकऱ्यांना धोका दिला. काँग्रेस सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे आश्वासन दिले. मात्र, नंतर कर्जमाफी केली नाही. अनेक कारणं सांगून टाळाटाळ केली. राजस्थानातील शेतकरीही कर्जमाफीची वाट पाहत आहेत. मात्र, अद्यापही त्यांना मदत मिळाली नाही. प्रत्येक निवडणुकीआधी कर्जमाफी देण्याची गोष्ट काँग्रेस करते. जेवढ्या घोषणा ते करतात, तेवढी कर्जमाफी करत नाही. शेतकरी विचार करत होता, आता सगळी कर्जमाफी होईल, मात्र, कर्जमाफी झाली नाही. कर्ज फक्त सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांनाच मिळाले. मागील आठ-दहा वर्षातील स्थिती पाहिली तर सर्व घोटाळ्यांचे पुरावे मिळतील. काँग्रेसने फक्त मतांचे राजकारण केले, असे मोदी म्हणाले.
युरिया खताअभावी शेतकऱ्यांची हाल
आमच्या सरकारने पीएम किसान सन्मान योजना सुरू केली आहे. त्यामुळे दहा वर्षात सुमारे साडेसात लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. त्यात कोणताही घोटाळा होणार नाही. सात आठ वर्षांपूर्वी युरिया खताची स्थिती काय होती. रात्रभर शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभे रहावे लागत होते. शेतकऱ्यांवर लाठीहल्लाही झाला. युरियाची काळाबाजार होत होता. खताअभावी शेतकऱ्यांचे पिक वाया जात होते. हा शेतकऱ्यांवर अत्याचार होता. ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांची ही स्थिती झाली. त्यावर विरोधक आता राजकारण करत आहे. त्यांना जर शेतकऱ्यांप्रती संवेदना असत्या तर अशी अवस्था झाली नसती. आम्ही शेतकऱ्यांची खताची समस्या कायमची सोडवली. घोटाळे कमी केले. अनुदान तर शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जात होती. मात्र, कोणीतही दुसराच ते पैसे खात होते, असा आरोप त्यांनी काँग्रेस सरकारवर केले.
१०० पेक्षा जास्त सिंचन प्रकल्प रखडले
पुढील काही वर्षात देशातील विविध राज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत खत कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. यातून रोजगारही निर्माण होईल. भारत युरिया उत्पादनात आत्मनिर्भर होईल. दुसऱ्या देशांतून मागविण्यात येणाऱ्या युरियावरील पैसे वाचतील. शेतकऱ्यांचे भले करण्याची नियती काँग्रेसकडे नव्हती. त्यांनी फक्त खोटे आश्वासने दिले. जुन्या सरकारांना चिंता असती तर १०० पेक्षा जास्त सिंचन प्रकल्प अडकून पडले नसते. कालवे तयार केले तर त्यांना एकमेकांशी जोडले नाहीत. जनतेचे पैसे वाया घालवले. आता आम्ही 'मिशन मोड'मध्ये काम करत आहोत. शेतकऱ्याला कमी खर्च यावा म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांना सौर ऊर्जवर चालणाऱ्या पंप शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यावेळी बोलताना मोदींनी शेतकरी आणि कृषी क्षेत्रासंबंधीच्या योजनांची माहिती दिली.