डेहराडून (उत्तराखंड) : उंचच उंच पर्वतरांगा असलेल्या मसूरीचे नैसर्गिक सौंदर्य जगप्रसिद्ध आहे. मसूरी हे स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. दरवर्षी अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात. मसूरीसोबतच येथे अनेक प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे आहेत, ज्यांचा इतिहास अतिशक रंजक असा आहे.
मसूरी हे पर्यटन स्थळ आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आज अनेक पर्यटकांची पहिली पसंत बनले आहे. हे स्थळ आजच नव्हे तर, स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच लोकांच्या मनावर राज्य करत आहे. यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिशांनीसुद्धा मसूरी शहराला विकसित करण्यासाठी आपले पूर्ण योगदान दिले होते. त्याकाळचे प्रसिद्ध आणि रंजक अशा अनेक कथांची साक्ष देत मसूरीचे गन हिल हे डोंगर आजही दिमाखात उभे आहे.
स्वातंत्र्य काळापूर्वी या डोंगरावर एक तोफ ठेवण्यात आली होती. दररोज ही तोफ डागली जायची. ज्यामुळे लोकांना त्यांच्या घरातील घड्याळांची वेळ सेट करण्यास मदत व्हायची. त्या काळात एखाद्याच्या घरी घड्याळ असणं ही मोठी गोष्ट मानली जात होती. फक्त ठराविक धनाढ्यांकडेच घड्याळ होते. त्यामुळे संपूर्ण शहराला वेळ कळावी, आणि सर्वांच्या घड्याळांमध्ये सारखीच वेळ राहावी यासाठी ही तोफेची शक्कल लढवली गेली. तर, दररोज या टेकडीवरून गवताचे तयार केलेले गोळे तोफेतून डागल्या जात होते. यामुळेच या टेकडीला 'गन हिल' हे नाव प्राप्त झाले. आजही येथील स्थानिक हा किस्सा मोठ्या हर्षाने सांगत असतात.
कशी बंद झाली ही प्रथा -
एके दिवशी नेहमीप्रमाणे तोफेतून गोळा डागण्यात आला. मात्र, यावेळी तो खाली रस्त्यावरून जात असलेल्या एका ब्रिटिश महिलेला लागला. यानंतर, ही प्रथा बंद करण्यात आली. आज या ठिकाणी ती तोफ तर नाही. मात्र तिच्याशी जुळलेले अनेक रंजक किस्से तुम्हाला तेथे गेल्यानंतर ऐकायला मिळतील. मात्र, हळूहळू या गोष्टी आणि त्याच्याशी जुळलेले अनेक किस्से काळाच्या ओघात संपुष्टात येत आहेत. आज या ऐतिहासिक स्थळाला गरज आहे येथील किस्से आणि गन हिलच्या इतिहासाचे जतन करण्याची. यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना करून हा वारसा जपण्याची गरज आहे.