किशनगंज (बिहार) - संगणकापेक्षाही जलद, कुशाग्र बुद्धीचा धनी 'गूगल बॉय कौटिल्य' सर्व परिचीत आहे. मात्र बिहार राज्यातील किशनगंज जिल्हातील अशाच एका कुशाग्र मुलीची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. या मुलीचे नाव सायोनिका असून ती ठाकुरगंज तालुक्याची रहिवाशी आहे. चार वर्ष वय असलेली ही मुलगी यूकेजीच्या वर्गात शिकते. प्रश्न संपण्याआधी उत्तर हजर असलेल्या या मुलीला भविष्यात डॉक्टर होण्याची इच्छा आहे.
अभ्यासेत्तर उपक्रमांमध्ये देखील अग्रेसर
सायोनिका एवढ्या लहान वयात आपल्या वर्गातील इतर विद्यार्थांना शिकवते. ती फक्त अभ्यासातच हुशार नसून इतर उपक्रमातही देखील अव्वल आहे. खेळ, नृत्य, गायन यांसारख्या शालेय उपक्रमात तिची प्रगती सर्वांना थक्क करते. तीच्या या कुशाग्रते मुळे परिसरात तिची 'गूगल गर्ल' म्हणून ओळख निर्माण झाली आहे. सायोनिकाची आई शिक्षिका असून वडिलांचा औषध विक्रीचा व्यवसाय आहे.
सोयोनिकाची कुशाग्र बुद्धी पाहून शिक्षक देखील अवाक
सायोनिकाचे शिक्षक तिची कुशाग्र बुद्धी पाहून थक्क आहेत. त्यांच्या मते ती इतर विद्यार्थांपेक्षा जलद आहे. एवढ्या लहान वयात या मुलीच्या स्मरणशक्तीचा आवाका प्रचंड आहे. तिच्या एवढे सामान्य ज्ञान लक्षात ठेवणे तर माझ्या आवाक्याचे बाहेर आहे. तिला शिकवताना आम्हाला जास्त परिश्रम करावे लागत नसून ती स्वत:च अनेक गोष्टी शिकून घेते.
सरकारकडून मदतीची आशा
सायोनिकाच्या आईच्या मते तिची ही बुद्धीमत्ता ईश्वरीय देण आहे. तिला शिकवण्यासाठी त्यांना जास्त कष्ट करावे लागत नाहीत. सायोनिकाने भविष्यात देशाची सेवा करावी, अशी त्याची ईच्छा आहे. तर तिच्या हितचिंतकांनी तिच्या उज्वल भविष्यासाठी शासनदरबारी मदतीची मागणी केली आहे. ज्याच्या माध्यमातून तिला भविष्यात योग्य क्षेत्र निवडता येईल.