जयपूर - सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहेत. संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस रात्रंदिवस काम करत आहेत. अशातही वेळ काळत पोलिसांनी एका चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा करत नागरिकांची मने जिंकली.
सध्या राजस्थानमधील कोटा शहरात अडकून पडलेल्या कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना घरी पाठविण्याच्या कामात पोलीस व्यग्र आहेत. मात्र, यातूनही वेळ काढत अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश मील आणि त्यांच्या पथकाने आकाशवाणी कॉलीनीत राहणाऱ्या धनिका या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला. केक घेवून पोलीस जेव्हा घरी पोहचले तेव्हा कुटुंबियांना आनंद झाला.
पहिलाच वाढदिवस असल्याने मोठा कार्यक्रम करण्याचा कुटुंबियांची ईच्छा होती. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व नियोजनावर पाणी फेरले गेले होते. केकही मिळणे अवघड झाले होते. त्यामुळे कुटुंबीय नाराज होते. त्यात पोलिसांनी वाढदिवस साजरा केल्याने सर्वजण आनंदी झाले. लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करणाऱ्या पोलिसांनी या कृतीतून खाकीतल्या माणूसकीचे दर्शन घडविले.