हैदराबाद - उत्तर प्रदेशमधील हरविलेल्या मुलाची तेलंगणा पोलिसांनी पाच वर्षानंतर पालकांशी भेट घडवून आणली आहे. त्यासाठी पोलिसांनी चेहरा ओळखणाऱ्या दर्पण अॅपची मदत घेतली आहे. सोम सोनी असे पोलिसांनी शोधून काढलेल्या मुलाचे नाव आहे.
सोम सोनी हा उत्तर प्रदेशमधील अलाहाबादच्या हंडियामधील रहिवासी आहे. तो २०१५ पासून हरविला होता. आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील बाल कल्याण केंद्रात हा हरविलेला मुलगा सापडला आहे. ही माहिती तेलंगणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक स्वाती लाकरा यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या की, गोलपारा पोलिसांनी सोम सोनीला बालकल्याण केंद्रात २०१५ ला पाठविले होते. तेलंगणा राज्य पोलिसांकडून हरविलेल्या मुलांना शोधण्यासाठी दर्पण टूलचा वापर करण्यात येत होता. तेव्हा त्यांनी हरविलेले मुले आणि बालगृहात असलेल्या मुलांचे फोटो पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा अलाहाबादमध्ये हरविलेला मुलगा आणि आसाममधील बालगृहातील मुलगा यांचा फोटो सारखाच असल्याचे पोलिसांना आढळून आले. ही माहिती तेलंगणा पोलिसांनी त्वरित अलाहाबादमधील हंडिया पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर हंडिया पोलिसांनी मुलाच्या पालकांना माहिती कळविली. पालकांनी आसाममधील बालगृहात जाऊन मुलाची भेट घेतली आहे.
यामध्ये तेलंगणा पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी मुलगा आणि पालकांना पाच वर्षानंतर भेट घडवून आणली आहे. दर्पणमधून अनेक हरविलेल्या मुलांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्वाती लाकरा यांनी सांगितले.