नवी दिल्ली - पाकिस्तानने जम्मू काश्मीरचे छायाचित्रे असलेला रिअल टाईममधील उपग्रहाचा डाटा चीनकडून खरेदी केला आहे. यामध्ये अतिस्पष्टता असणारे व्हिडिओ, ऑप्टिकल आणि हायपरस्पेक्ट्रल छायाचित्रे आदींचा समावेश आहे. त्यामधून जम्मू काश्मीरच्या सीमेलगत असलेल्या भारतीय लष्करांच्या स्थितीची माहिती पाकिस्तानला कळू शकणार आहे.
गुप्तचरांच्या माहितीनुसार पाकिस्तानने जिलीन-१ उपग्रहाचा डाटा २०२० खरेदी करण्यासाठी चीनबरोबर करार केला आहे. जिलीन हे एकाच कक्षेत असलेल्या १० उपग्रहांचे नेटवर्क आहे. त्यामधून जगभरातील छायाचित्रे घेणे उपग्रहांना शक्य आहे. दिवसभरात पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची दोनवेळा छायाचित्रे काढण्याची या उपग्रहाच्या नेटवर्कमध्ये क्षमता आहे. ही उपग्रह यंत्रणा चीनच्या चँग गुयांग सॅटेलाईट टेक्नॉलीज कंपनीकडून चालविण्यात येते.
जिलीनकडून डाटा खरेदी करण्यामागे जमिनी आणि नैसर्गिक स्त्रोत, नैसर्गिक आपत्तीची देखरेख, कृषी संशोधन, शहरातील बांधकाम हा उद्देश्य असल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे. चीनने २०१८ मध्ये पाकिस्तानमधून दोन उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरसाठी हे सॅटेलाईट प्रक्षेपण करण्यात आल्याचा दावा त्यावेळी दोन्ही देशांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, चीनकडून पूर्व लडाखमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचा भंग करण्यात येत आहे.