नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री के. के. तिवारी यांनी जयराम रमेश हे 'करिअरिस्ट' नेते असल्याची टीका केली आहे. 'केवळ टीकेसाठी टीका करणे योग्य नाही. मोदींनी केलेल्या कामांकडेही पाहिले पाहिजे. मोदींचे सरकार हे पूर्णपणे नकारात्मक स्थिती निर्माण करणारे नाही,' असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटल्याची माहिती मिळाली आहे.
'केवळ मोदींवर टीका करत बसल्याने काही होणार नाही. मोदींनी केलेले कार्य समजून न घेता त्यांना दूषणे देऊन काही फायदा होणार नाही. कोणत्या बाबी पूर्वी केल्या गेल्या आणि कोणत्या केल्या गेल्या नाहीत, याचा विचार करणे आवश्यक आहे. मोदींनी केलेली जी कामे लोक समजून घेत आहेत, ते आपण समजून घेतले नाहीत तर, त्यांना लढत देणेही आपल्याला शक्य होणार नाही. केवळ मोदींची बदनामी करून काही होणार नाही,' असे जयराम रमेश यांनी म्हटल्याचे समोर येत आहे.
जयराम यांच्या या विधानानंतर माजी मंत्री तिवारी यांनी ते 'करिअरिस्ट' नेते असल्याची टीका केली. 'जयराम रमेश यांनी स्वतःचे राजकीय 'करिअर' वाचवण्यासाठी मोदींचे कौतुक करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ते एखाद्या गावातील पंचायती निवडणुकांमध्येही निवडून येऊ शकणार नाहीत. जी व्यक्ती निवडून येऊ शकत नाही, अशांना राज्यसभेवर घेण्यात काही अर्थ नाही,' असेही वरिष्ठ काँग्रेस नेते तिवारी यांनी म्हटले आहे.
जयराम रमेश काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात पर्यावरणमंत्री होते. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांच्या वक्तव्याचे त्यांनीही समर्थन केल्याचे दिसत आहे. सिंघवी यांनीही 'मोदींवर प्रत्येक बाबतीत सरसकट टीका करणे आणि त्यांचे राक्षसीकरण करणे योग्य नसल्याचे' म्हटले होते.