श्रीनगर - जम्मू काश्मिरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहीदीन दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ठार झाला आहे. तर एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. श्रीनगर शहराजवळ ही चकमक झाली.
अनेक दहशतवादी कारवायांमध्ये होता सहभाग
सैफुल्ला असे ठार करण्यात आलेल्या कमांडरचे नाव आहे. यावर्षी मे महिन्यात रियाझ नायको या कमांडरला सुरक्षा दलांनी ठार केले. त्याच्याजागी सैफुल्ला यास नेमण्यात आले होते. सैफुल्ला काश्मीर खोऱ्यातील 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवादी होता. अनेक दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग होता.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शोध मोहिम हाती घेतली आहे. अद्यापही कारवाई सुरू आहे. रंगरीथ भागातील जुन्या विमानतळ परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. दहशतवाद्यांचा शोध घेत असताना त्यांनी अचानक जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तर दाखल सुरक्षा दलांनी गोळीबार केला. यात हिज्बुल मुजाहीदीनच्या कमांडर (म्होरक्या) ठार झाला. दोन्ही बाजूंनी अद्यापही गोळीबार सुरू असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.