नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसप प्रमुख मायावती यांना प्रचार करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आदित्यनाथ यांच्यावर ७२ तर मायावतींवर ४८ तासांची बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजेपासून त्यांच्यावरील बंदीला सुरुवात होईल.
आचारसंहिता भंगामुळे निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. आयोगाने योगीवर ७२ तासासाठी निवडणूक प्रचारंबदी लावली आहे. निवडणूक इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर एवढी मोठी कारवाई करण्यात आली असेल.
निवडणूक प्रचारकाळात अनेक नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्ये आली. निवडणूक आयोगाकडून नोटीस जात राहिल्या. मात्र, कारवाई कमी प्रमाणात झाली. यावरुन अनेक प्रश्न निर्माण झाले. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने यासंबंधी निवडणूक आयोगाला निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच योगी आदित्यनाथ आणि मायावतींवर कारवाई झाली आहे.
यापूर्वी कधी झाली कारवाई ? -
२०१४च्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने आझम खान यांच्याविरोधात मोठी कारवाई केली होती. उग्र भाषण दिल्याच्या आरोपामुळे खान यांच्यावर जाहीर सभा आणि रोड शो करण्यास बंदी लावण्यात आली होती. तसेच २०१४मध्येच अमित शाह यांच्यावरही प्रचारबंदी लावण्यात आली होती. मात्र, त्यांच्या आश्वासनानंतर बंदी हटवण्यात आली.
काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ ? -
काँग्रेस, सप आणि बसपला जर 'अली'वर विश्वास असेल तर आम्हालाही बजरंगबलीवर विश्वास आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.