नवी दिल्ली - कोलकातामध्ये मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान राडा झाला होता. त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचाराचा अवधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय घटनाविरोधी असून आज लोकशाहीतील काळा दिवस आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये २ प्रचारसभा होणार आहेत. त्यांनाच निवडणूक आयोगाने प्रचार सभा घेण्याची परवानगी दिली. या प्रचारसभेनंतर पश्चिम बंगालमध्ये प्रचार बंदी लागू होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घटनाविरोधी आहे, असे वक्तव्य काँग्रसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले, निवडणूक आयोग आपली विश्वासार्हता गमावून बसली आहे. निवडणुकीतील आचारसंहिता मोदींची निवडणूक प्रचार संहिता बनली आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
मोदी आणि शाह याच्यामुळे लोकशाही धोक्यात येत आहे. मोदींकडून वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन केले जात आहे. काँग्रेसने याबाबत वेळोवेळी पुरावे सादर केले. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप सुरजेवाला यांनी केला.