नवी दिल्ली - लोकसभेच्या ५ व्या टप्प्यातील देशभरातील प्रचाराच्या तोफा आज (शनिवारी) संध्याकाळी थंडावणार आहेत. ५ टप्प्यात ७ राज्यांमधील ५१ मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमध्ये ६ मे रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशातील १४ मतदार संघांमध्ये लढत रंगणार आहे. यात अत्यंत महत्त्वाच्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांचा समावेश आहे. ५ व्या टप्प्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या टप्प्यात आतापर्यंतच्या सर्व टप्प्यांच्या तुलनेत सर्वाधिक १२ टक्के महिला उमेदवार आहेत.
अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि रायबरेलीतून संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी लढणार आहेत. त्यांच्या विरोधात अमेठीमधून भाजपच्या स्मृती इराणी आणि रायबरेलीतून भाजपच्या दिनेश प्रताप सिंह यांना अनुक्रमे मैदानात उतरवण्यात आले आहे. दिनेश प्रताप सिंह यांनी नुकताच काँग्रेसमधून बाहेर पडत भाजप प्रवेश केला आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी बसप, सप आणि रालोद यांच्या महाआघाडीचा उमेदवार रायबरेलीत उतरवण्यात आलेला नाही.
या टप्प्यात राजस्थानातील उर्वरित सर्व १२ जागांवर मतदान होणार आहे. राजधानी जयपूर ग्रामीण येथून भाजपतर्फे केंद्रीय मंत्री आणि नेमबाज राजवर्धसिंह राठोड रिंगणात आहेत. जोधपूर येथून गजेंद्र सिंह शेखावत, बाडमेर येथून कैलाश चौधरी, बीकानेर येथून अर्जुन राम मेघवाल, चितौडगढमधून सी. पी. जोशी भाजपचे उमेदवार आहेत. तर, शेखावत यांच्याविरोधात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत, बाडमेर येथे कैलाश चौधरी यांच्या विरोधात ज्येष्ठ काँग्रेस नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह हे आहेत. नेमबाज राजवर्धनसिंह राठो़ड यांच्या विरोधात काँग्रेस नेते कृष्णा पुनिया उभे आहेत. उदयपूरमध्ये भाजपकडून अर्जुनलाल मीणा तर काँग्रेसकडून रघुवीर सिंह मीणा मैदानात आहेत.