नवी दिल्ली - एअर इंडियाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांमधून यावर्षी आतापर्यंत लैंगिक अत्याचाराच्या आठ तक्रारी दाखल झाल्या आहेत. २०१८ मध्येही अशा दहा तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. २०१९ मधील अजून सहाच महिने झाले आहेत, मात्र एवढ्यातच आठ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.
एअर इंडियामध्ये लैंगिक छळाच्या घटना या वारंवार होत असल्याचे निदर्शनास येत आहेत आणि यासंदर्भात कंपनीने कडक पावले उचलायला हवीत. असे यावर्षी १६ मे रोजी, एअर इंडियाचे प्रमुख अश्वानी लोहानी यांनी कर्मचाऱ्यांना टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून सांगितले होते.
१५ मे रोजी एका महिला वैमानिकाने एका कमांडर विरोधात लैंगिक छळाची तक्रार केली होती. त्यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश दिल्यानंतर हा मेसेज कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी १ जानेवारी ते १ जुलैच्या दरम्यान लैंगिक अत्याचाराच्या आठ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. कंपनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, त्यावर शक्य तितकी कडक कारवाई करत आहे.
५ मे रोजी हैदराबाद येथे ट्रेनिंगदरम्यान कमांडरने वैमानिकाशी गैरवर्तणूक केली होती. त्यानंतर २० तारखेला त्या कमांडरला कारवाई पूर्ण होईपर्यंत, लेखी परवानगीशिवाय एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये येण्यास मनाई करण्यात आली. एअर इंडियाच्या उत्तर विभागाचे प्रादेशिक संचालक अभय पाठक यांनी आरोपीला परवानगीशिवाय दिल्ली सोडता येणार नसल्याची देखील सूचना केली.