नवी दिल्ली - माजी उड्डयनमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना निदेशालय संचालयाने (ईडी) दुसऱयांदा समन्स बजावला आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांना आता १० किंवा ११ जून यापैकी एक दिवस चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितले आहे.
याआधी ईडीने पटेल यांना समन्स बजावून ६ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, पटेल चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. पटेल यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले होते, की काही वैयक्तीक कारणांमुळे मी चौकशीसाठी गैरहजर होतो. याबद्दल त्यांनी चौकशीसाठी दुसरी तारीख देण्याची मागणी केली होती.
पटेल यांनी ईडीच्या पहिल्यांदा समन्स बजावल्यानंतर म्हटले होते, की मला ईडीच्या चौकशीसाठी सामोरे जाण्यास कोणतीही अडचण नाही. मी ईडीला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार आहे. हवाई क्षेत्रातील किचकट बाबी त्यांना मी समजावून सांगणार असून त्यांचा गैरसमज दूर करणार आहे.
काय आहे प्रकरण?
पटेल उड्डयन मंत्री असताना २००८-०९ या काळात अवैधरित्या विमान उड्डाणाचे सौदे करण्यात आले होते. दीपक तलवार याने फायद्याचे असणारे हवाईमार्ग काही कंपन्यांना मिळवून दिले आहेत, यासाठी दीपक तलवारला मोठी रक्कम मिळाला होती, असा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. या आरोपावरुन दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक झाली होती. दीपक तलवार पटेल यांचा चांगला मित्र होता, असे ईडीचे म्हणने आहे.