नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचार सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य करणे भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि परवेश साहिब सिंग वर्मा यांना महागात पडले आहे. निवडणूक आयोगाने या दोघांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार या दोघांना स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्यात आले आहे.
केंद्रिय निवडणूक आयोगाने मंगळवारी अनुराग ठाकूर यांना नोटीस पाठवली होती. तसेच ३० तारखेपर्यंत उत्तर मागवले होते. भाजप उमेदवार मनीष चौधरीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
काय घोषणा दिली होती?
दिल्लीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अनुराग ठाकूर यांनी 'देश के गद्दारोंको...अशी घोषणा दिली होती, त्यांच्या या घोषनेनंतर उपस्थितांनी 'गोली मारो *** को' असे नारे दिले होते. या घटनेनंतर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. तसेच, ३० जानेवारीला दुपारी दोनपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.