हैदराबाद - लॉकडाऊनमुळे ज्यांना दारू मिळण्यास अडचण होते आहे, अशा 'गरजू' व्यक्तींना 'पेग' वाटणाऱ्या हैदराबादच्या 'देवदूता'ला तेलंगाणा पोलिसांनी अटक केली आहे. 'समाजसेवे'च्या नावाखाली, सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट या व्यक्तीच्या चांगलाच अंगलट आला आहे.
कुमार असे नाव असलेल्या या व्यक्तीने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते, की दारुचे व्यसन लागलेल्या लोकांना दारु मिळत नसल्यामुळे अडचण होत आहे. यांपैकी बऱ्याच लोकांना रुग्णालयातही दाखल करावे लागत आहे. त्यामुळे, अशा गरजू लोकांना मी दारू वाटत आहे. यानंतर त्याने असे करतानाचा व्हिडिओ बनवून, तो सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमुळेच त्याला अटक करण्यात आली आहे.
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने दारूचा अवैध साठा केल्याप्रकरणी तेलंगाणा उत्पादन शुल्क व बंदी कायद्यानुसार कुमारविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला, आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यता आली.
देशभरात लॉकडाऊनमुळे दारुची दुकाने बंद आहेत. त्यामुळे तळीरामांचा रोजच उपवास घडत आहे. दरम्यान, आसाममधील तळीरामांचा उपवास मात्र मिटणार असे दिसत आहे, कारण आसाम आणि मेघालयातील सर्व मद्याची दुकाने आणि घाऊक गोदामे सोमवारपासून मर्यादित तासांकरिता उघडतील, असे अधिकृत आदेश रविवारी देण्यात आले.
हेही वाचा : लॉकडाऊन दरम्यान करा या 'सप्तपदींचे' पालन; पंतप्रधान मोदींचे आवाहन..