रायपूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले असून सर्व व्यवहार बंद आहेत. यामुळे जनजीवन ठप्प होऊन अनेक समारंभही रद्द करावे लागले आहेत. लॉकडाऊनच्या काळात देशातील पोलीस प्रशासन अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. छत्तीसगडमधील एका पोलीस अधिकाऱ्याने आपला विवाह सोहळा रद्द करत कर्तव्याला प्राधान्य दिले आहे.
गारिबंदचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय ध्रुव यांचा विवाह ३ एप्रिल रोजी होणार होता. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा सोहळा रद्द केला. चंपारण्यचे रहिवासी असलेले संजय मागील तीन वर्षांपासून गारिबंद येथे कार्यरत आहेत.
हेही वाचा - दारूसाठी काय पण! 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
संजय यांचा विवाह सोहळा दुर्ग येथे आयोजित केला होता. दोन्ही कुटुंबियांनी लग्नाची तयारी केली होती. संजय यांनी विवाहासाठी वरिष्ठांनी रजाही मंजूर केली होती. दरम्यान, कोरोना विषाणूने धुमाकूळ सुरू केला. त्यामुळे हा विवाह सोहळा रद्द करुन अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलला आहे.
आत्ता गारिबंदला माझी सर्वात जास्त गरज आहे. लग्नापेक्षा माझी नोकरी आणि लोकांची सेवा या बाबींना जास्त महत्त्व आहे, असे संजय ध्रुव यांनी सांगितले.