नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत अजूनही अनेक कामगार अडकलेले आहेत. या कामगारांच्या मदतीला अभिनेत्री स्वरा भास्कर पुढे सरसावली आहे. स्वरा भास्करने आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या मदतीने अनेक कामगारांना घरी पाठवण्यास मदत केली आहे.
आतापर्यंत १५०० कामगारांना पाठवले बिहारला
स्वरा भास्करकडे सोशल माध्यमावर कामगारांनी मदतीची याचना केली होती. यावर स्वरा भास्करने सोमवारी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थान परिसरातून १० बसची व्यवस्था या कामगारांना घरी सोडण्यासाठी केली होती. त्यानंतर स्वरा भास्करने ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.
कामगारांची मागितली माफी
बस रवाना करण्यापूर्वी स्वरा भास्करने या कामगारांना भोजन भरलेली पाकिटे वाटली. या दरम्यान स्वरा भास्कर या कामगारांची माफी मागतानाही दिसून आली. याबाबत स्वराला विचारले असता, या कामगारांनी अगोदर मदत मागितली होती. मात्र बसची परवानगी घेण्यास विलंब झाला. त्यामुळे या कामगारांनाही घरी पोहोचवण्यास विलंब झाल्याने त्यांची माफी मागितल्याची माहिती स्वराने दिली. कामगारांची व्यवस्था करण्यास सरकार कमी पडले आहे का, याबाबत विचारले असता, ही वेळ राजकारण करण्याची कामगारांना मदत करण्याची असल्याचेही स्वराने स्पष्ट केले. यावेळी स्वराने संजय सिंह आणि दिलीप पांडेय या आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी कामगारांची मदत केल्याबाबत विशेष उल्लेख केला. तर वाजीद खान यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीचे नुकसान झाल्याची भावनाही स्वराने व्यक्त केली.